देशात व राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवत आहे.मात्र या उपाययोजना राबवताना आर्थिक मदतीची गरज असल्याने त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने मदतीचे आवाहन समाजातील घटकांना केले आहे.या आवाहनाला प्रतिसाद देत अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा समिती ग्रामीणच्या वतीने कोरोना निवारण व प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
साने गुरुजी कथामालेद्वारा मुख्यमंत्री सहाय्यता मदतनिधीसाठी अकरा हजार एकशे अकरा रुपयेचा धनादेश प्रांताधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडे कथामाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे,सचिव चांगदेव पडवळ,कार्यकारी सदस्य संतोष थोरात यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने कथामाला कार्यकारिणीची राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कारप्राप्त शाळा शिवनगर(ता.शिरूर) येथे होणारी नियोजित मासिक सभा कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर रद्द करून वॉट्स-अप चर्चा घेण्यात आली .प्रमूख कार्यवाह शामराव कराळे,मार्गदर्शक संजय डुंबरे,राज्यप्रतिनिधी संजय शिर्के ,उपाध्यक्ष बाळासाहेब घोडे,कोषाध्यक्ष संतोष गडगे ,कार्याध्यक्ष राजेश कांबळे, मंगेश मेहेर,रवींद्र वाजगे ,सुनील पाटील ,बबनराव सानप,वैशाली गाढवे,मनीषा कानडे यांनी चर्चेत सहभाग घेऊन सर्वप्रथम राष्ट्रीय कार्य म्हणून आपण सारे यात सहभागी होऊन आपापल्या भागात खबरदारीने वागणे ,केंद्र व राज्य सरकारचे सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे ,योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनबाबत प्रबोधन करणे,शालेय विद्यार्थीमित्रांना वाचन व अभ्यासास प्रवृत्त करणे ,आपले कार्यक्षेत्रात कोणीही उपाशी राहणार नाही याबाबत दक्षता घेणे व जबाबदार नागरिक म्हणून अफवांवर विश्वास न ठेवणे ,चुकीच्या पोस्ट टाकू नये,मुख्यमंत्रीनिधीस मदत तर करूयाच पण आपापल्या परीने आपल्याच कार्यक्षेत्रात मदत करणेबाबत चर्चा केली .
महाराष्ट्र राज्यातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे,हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे.पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.सध्य स्थितीत कोरोनाआपत्ती निवारणासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा निधी दिल्याचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे यांनी सांगितले.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा समिती ग्रामीणच्या वतीने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी उपविभागीय प्रांताधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडे धनादेश देताना कथामाला कार्यकर्ते.