संपूर्ण जगभर कोरोना विषाणू ने धुमाकूळ घातला असून प्रशासन आपापल्या पातळीवर अनेक उपाययोजना राबवित असल्याचे दिसून येत आहे.पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून,त्याची अंमलबजावणी जिल्ह्यासह नारायणगाव शहरात देखील केली आहे.
नारायणगाव पोलिस स्टेशनच्या वतीने निमगावसावा, वडगाव कांदळी, धनगरवाडी, वारूळवाडी व नारायणगाव या 5 बीट मध्ये पोलिसांच्या पाच टीम डोळ्यात तेल घालून पेट्रोलिंग करीत आहेत.नारायणगाव शहरातील सर्व दुकाने, आस्थापना शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होणार आहे. त्यामध्ये हाॅस्पीटल्स, जीवनावश्यक वस्तू- छोटी किराणा दुकाने, मेडिकल, दूध, छोटे भाजीपाला विक्रेते यांना वगळण्यात आले आहे.
शहरातील मुस्लिम बांधवांनी नमाज घरी पठण करण्याचे मान्य केले आहे. प्रशासना द्वारे धार्मिक स्थळांवर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. लग्न कार्यालय, हॉटेल व्यवसाय, बिअर बार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नारायणगाव मध्ये जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्यामुळे शहरातील कोठारी व्हील्स वर कारवाई करण्यात आली आहे. कोठारी व्हील्स आस्थापना शासनाचा आदेश असूनही सकाळी 10.30 वाजता चालू ठेवून,त्यामध्ये लोकांची गर्दी जमवून आणि दुकानातील कामगार एकत्र जमवून दुकानातील गाड्यांची विक्री व दुरुस्ती करीत असल्याचे आढळून आले.त्यामुळे जिल्हाधिकारी यांचा आदेश क्रमांक पुणे क.जि.आ.व्य. / का. वि. /138 / 2020 अन्वये अवमान केल्याप्रकरणी नरेंद्र शरदचंद्र करंदीकर ( असि. जनरल मॅनेजर, कोठारी व्हील्स ) प्रवीण दिवेकर ( व्हाईस चेअरमन,कोठारी व्हील्स ) यांचे विरुद्ध भा.द.वि. कलम 188 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.असे नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी सांगितले.
नारायणगाव शहरातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती लोकनियुक्त विद्यमान सरपंच बाबुभाऊ पाटे, सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील. वैद्यकीय अधिकारी व पोलीस पाटील यांनी केले आहे.