जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनामुळे भारतातही चिंतेची परिस्थिती आहे. देशातही कोरोनाचे तब्बल ३५० रुग्ण सापडले असून यात ५ रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. याच पर्शवभूमीवर कोरोना विषाणूचा भारतात प्रसार थोपविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी २२ मार्च ला जनता कर्फ्यु ची हाक दिली होती. त्याला देशवासियांनी प्रतिसाद देत घरातच थांबणे पसंत केले आहे.
मंचर येथे देखील काही तुरळक अपवाद वगळता जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मंचर पोलिसांनी, स्थानिक प्रशासनाने गेले तीन ते चार दिवस योग्य नियोजन करत २२ मार्च ला जनता कर्फ्यु यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत जनतेमध्ये उत्तम जागृती केल्याचे जाणवले.
जनता कर्फ्युच्या आदेशाला धुडकावून बाहेर पडणाऱ्या उनाड नागरिकांना मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले यांनी त्यांच्या विशेष शैलीत वठणीवर आणले.
दर रविवारी मंचर येथे आठवडे बाजार भारत असतो. या बाजारात संपूर्ण तालुक्यातून व्यापारी आणि ग्राहक मोठ्या प्रमाणात येत असतात. बाजाराच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग इत्यादी अनेक घटकांनी योग्य नियोजन करत जनता कर्फ्यु यशस्वी होण्यासाठी योगदान देत, सार्वजनिक आरोग्य जपण्याचे कार्य यशस्वी केले.
कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोव्हिड १९ या आजारावर अजूनही कुठलीही लस सापडली नसून, या आजाराची साखळी तोडणे आणि संक्रमण होऊ न देणे हेच उपाय आहेत. देशात कोरोनाचे संक्रमण अजूनही दुसऱ्याच टप्प्यात आहे. ते तिसऱ्या टप्प्यात जाऊ द्यायचे नसेल तर शासन आणि प्रशासन करत असलेल्या सूचना पाळण्याचे वारंवार सांगण्यात येत आहे.