पुणे शहरासह जिल्ह्यात ‛कोरोना' व्हायरसचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ‛आपत्ती व्यवस्थापन कायदा' लागू केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास आणि आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्यात येणार आहे.
पुण्यामध्ये कोरोनाचे संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि विषाणूंच्या फैलाव अधिक होऊ नये म्हणून तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यात हा कायदा लागू केल्याचे आदेश दिले आहेत. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
#आपत्ती व्यस्थापन म्हणजे काय ?
आपत्ती व्यवस्थापनमध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून ती पूर्णवेळ तैनात ठेवायची आहेत, संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करायची आहे, तसेच स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणे, जिल्ह्यातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांना निरीक्षणाखाली ठेवणे, सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे इत्यादी कामे केली जाणार असून हा कायदा लागू केल्यामुळे आता आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा अधिकार प्रशासनाला असून मास्कची जादा दराने विक्री, औषधांची साठेबाजी केल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे.
मदतीसाठी संपर्क क्रमांकही देण्यात आला असून पुढील क्रमांकावर आपण संपर्क करू शकता.
टोल फ्री क्रमांक - 104
राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक - 91-11-23978046