डिंभे- प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यात आदिवासी दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेने मातृ-पितृ पूजन कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमात शाळेतील सर्व मुले व माता-पिता सहभागी झाले होते.
समाजामध्ये चॉकलेट डे ,टेडी डे , प्रॉमिस डे व वेलेन्टाइन डे साजरे करण्यापेक्षा मातृ-पितृ पूजन डे साजरे करणे काळाची गरज आहे. संपूर्ण विश्वामध्ये आई वडिलांचे स्थान सर्वात उंचीवर आहे. खरे प्रेम आई वडीलच देऊ शकतात. सेवेमध्ये सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे आई वडिलांची सेवा करणे हेच जीवनाचे खरे सार्थक.त्यांच्या सेवेमध्ये सर्व तीर्थ दडलेली आहेत.त्यांच्या चरणस्पर्शामुळे जीवनात काहीच कमी पडत नाही.मुलांच्या चुकीच्या वागण्याने आई वडिलांना असहय्य वेदना सहन कराव्या लागतात. हेच संस्काराचे बीज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंढारवाडीचे मुख्याध्यापक बाळासाहेब इंदोरे व सहशिक्षक नामदेव बांबळे यांनी सर्व मुलांच्या आई वडिलांना शाळेत बोलावून मातृ-पितृ पूजन कार्यक्रम साजरा केला. आई वाडीलांप्रति असणारे प्रेम कृतीतून व्यक्त करण्याची संधी मुलांना मिळाली. मुले व पालकांना अक्षरशः गहिवरून आले.
या कार्यक्रमासाठी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन, विस्तार अधिकारी रामदास पालेकर, केंद्रप्रमुख रंजना उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.अजित सोनवणे सर, व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष विजय बेंढारी, अशोक दांगट, अंगणवाडी ताई आशा दांगट, शैला सुपे, मीरा बेंढारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सुत्रसंचलन बाळासाहेब इंदोरे व आभार नामदेव कांबळे यांनी मानले.