मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जगदीश मूलाराम सोळंकी यांच्या मालकीच्या भैरव ट्रेडर्स पिंपळगाव फाटा येथे मंचर पोलीस व अन्न व औषध प्रशासन पुणे यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत ६९,८२६ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.
याप्रकरणी जगदीश सोळंकी यास मंचर पोलिसांनी अटक केली आहे. मंचर शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड पेट्रोलिंग करत असताना, गुप्त बातमीदरकडून मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव फाटा येथील भैरव ट्रेडर्स येथे गुटका विक्री होत असल्याची माहिती मिळाली. तद्नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड व इतर कर्मचारी यांनी तपासणी केला असता त्या ठिकाणी एकूण ६९,८२६ रुपयांचा मुद्देमाल मंचर पोलिसांनी ताब्यात घेतला असून, मंचर पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी सहआयुक्त विभाग पुणे यांना ई-मेल द्वारे कळून अन्नसुरक्षा अधिकारी , वंदना रुपनवर,अशोक इलागेर यांनी मंचर पोलीस ठाणे येथे येऊन मंचर पोलीसानी ताब्यात घेतलेल्या इसमाची चौकशी करत सदर गुटखा पुनर्वापर होऊ नये म्हणून सील केला गेला आहे.