आंबेगाव तालुक्यातील महाळूगे पडवळ,येथे घरफोडी करून चोरी करणाऱ्या व चांडोली बुद्रुक येथे दुकानाचे शटर उचकटून पैसे चोरणाऱ्या तसेच मंचर, राहुरी, नगर ,ओतूर,येथील पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत चोरट्याना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाने अटक केली आहे.
तुकाराम बन्सी वारे (वय वर्षे १९ राहणार पळशी ता.पारनेर जि.अहमदनगर)व उत्तम दादाभाऊ दुधवडे (वय २५ राहणार वाळूचादरा ता.राहुरी जि.अहमदनगर) या दोन आरोपींना अटक केली असून त्यांनी आंबेगाव तालुक्यासह इतर ठिकाणी केलेल्या विविध गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस करत आहेत.
आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे दिनांक २७/५/२०१९ रोजी बंद घर फोडून सुमारे २ लाख १८ हजार रुपयाची सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम,कागदपत्रे चोरी केली होती , तसेच चांडोली बुद्रुक येथे दिनांक १२/६/२०१९ रोजी गावातील गोरोबा जनरल स्टोअर या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून ९ हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केली होती. तर यातील एक आरोपीने राहुरी येथे एका केसच्या तपासादरम्यान मंचर पोलिसांवर हल्ला करून पळून गेला होता तेव्हापासून या आरोपींचा शोध सुरू असताना शुक्रवार दिनांक २८/२/२०२० रोजी आळेफाटा येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुकाराम बन्सी वारे व उत्तम दादाभाऊ दुधवडे या दोन आरोपींना सापळा रचून पकडले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस हवालदार एस.ए.जावळे, पो.ह.शरद बांबळे ,पो.ह.एस.व्ही.जम,पोलीस नाईक डी.डी. साबळे, पोलीस शिपाई अक्षय नवले, यांच्या पथकाने केली आहे.
या आरोपींवर पुणे ,अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून अजून गुन्हे उघडण्याची शक्यता आहे या विविध गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता या आरोपींच्या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.