प्रमोद दांगट । पारगाव
दत्तात्रयनगर,पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व कारखान्याचे संस्थापक-चेअरमन दिलीपराव वळसे पा, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत गाळप हंगाम २०१९-२० मध्ये गाळप केलेल्या ऊसास एफ.आर.पी. नुसार प्रथम हप्ता रु. २६९०/- प्र.मे.टन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दि. २७ डिसेंबर रोजी ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर ऊस बिलाची रक्कम वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले की, गाळप हंगाम २०१९-२० मध्ये दि. १५ डिसेंबर २०१९ अखेर १ लाख ८३७ मे.टन ऊसाचे गाळप झाले असून रु. २६९०/- प्र.मे.टनाप्रमाणे रक्कम रु. २७ कोटी १२ लाख ५२ हजार ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.आजपर्यंत कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतक-यांना चांगला दर देण्याचा प्रयत्न केला आहे. एफ.आर.पी. नुसार रु. २६९०/- प्र.मे.टनाप्रमाणे ऊस बिलाची रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग झाल्याने ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.गाळप हंगाम २०१९-२० मध्ये दि. २७/१२/२०१९ अखेर १,५८,५६० मे.टन ऊसाचे गाळप करुन १०.५९ टक्के साखर उता-याने १,६२,१०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांनी भीमाशंकर कारखान्यास ऊस गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन बेंडे यांनी केले.