बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करणार होते, कुणाकुणाला भेटले याची सर्व माहिती, विखेंचा दावा.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे भाजपमध्ये प्रवेश करणार होते, असा खळबळजनक दावा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे
राधाकृष्ण विखे म्हणाले, “अहमदनगरमध्ये १२ जिल्ह्यांपैकी यांना अवघ्या तीन जागा लढवता आल्या. त्यातच यांना कसंबसं यश मिळालं. बाळासाहेब थोरात यांनी माझ्या काँग्रेस पक्षातील प्रवेशाची काळजी करु नये. कारण पूर्वी त्यांचाच भाजपमध्ये जाण्याचा विचार होता. दोन ते तीन वर्षांपूर्वी ते कोणत्या नेत्याला जाऊन भेटले होते हे आता मी सांगण्याची गरज नाही.”
बाळासाहेब थोरात यांना सर्व अपघाताने मिळालं आहे. यात त्यांचं कर्तुत्व काहीही नाही. साडेचार वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून मी जे काम केलं त्यामुळेच काँग्रेसला हे अच्छे दिन आले. मी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही भांडलो. त्यावेळी थोरात साडेचार वर्ष गायबच होते. ते न सभागृहात बोलत होते, ना सभागृहाच्या बाहेर बोलत होते. आता त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा फुटबॉल झाला आहे, असा आरोपही विखेंनी थोरातांवर केला.
"स्वतःच्या राजकीय महत्त्वकांक्षेसाठी काँग्रेस-शिवसेनाला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं"
विखे म्हणाले, “बाळासाहेब थोरात यांनी स्वतःच्या राजकीय महत्त्वकांक्षेसाठी काँग्रेस शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला पक्षाच्या भूमिका आणि पक्षाबद्दल काही सांगण्याचं कारण नाही. या विधानसभा निवडणुकीत लोकांनी हे अनुभवलं आहे. त्यांनी निवडणुकीत हेलिकॉप्टर भाड्याने आणलं, पण ते संगमनेरमध्येच मुक्कामी ठेवलं. कारण त्यांना स्वतःचा मतदारसंघ सोडून पक्षाच्या प्रचारासाठी बाहेर जाता आलं नाही.”