उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 30 तारखेला होणार आहे. तत्पुर्वी उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवारंच पुन्हा शपथ घेतील असे सुतोवाच करण्यात येत आहे. यासाठी पुणे पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शपथविधिपुर्वीच जंगी स्वागत समारंभ व शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचं रितसर पत्रकदेखील राष्ट्रवादीकडून काढण्यात आलं आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पदाधिकारी-कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांना या कार्यक्रमाची कल्पना दिली आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला जाण्यापूर्वी अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये येणार आहेत. याच दिवशी त्यांचे स्वीयसहाय्यक सुनील मुसळे यांच्या मुलाचे रिसेप्शन आहे. तिथं अजित पवार उपस्थित राहतील. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देत त्यांचं स्वागत केलं जाणार आहे.
दरम्यान, फडणवीसांसोबत 80 तासांच सरकार स्थापन केल्यानंतर अजित पवार यांच पक्षातील वजन कमी झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे त्यांच उपमुख्यमंत्रिपद त्यांच्याकडून निसटल्याची चर्चा रंगली होती. तसेच, मुंबईतील उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचं वाटप न झाल्याने सस्पेन्स वाढला होता. त्यातच सिंचन घोटाळ्यात एसीबीने क्लीन चिट दिल्यामुळे त्यांची इमेज सुधारण्यास मदत झाली होती. अशातच आता पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देण्यात येणार असल्याने अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री फिक्स मानले जात आहे.
तसेच, यापुर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार असे म्हटले होते. त्य़ामुळे उपमुख्यमंत्रिपद अजित पवारांनाच मिळणार यावर जवळपास महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.