आसामचा इतिहास, भाषा आणि संस्कृतीवर आम्ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आक्रमण होऊ देणार नाही. आसामवर नागपूरचे नियंत्रण येऊ देणार नाही. आरएसएसच्या चड्डीवाल्यांच्या हातात आसाम जाऊ देणार नाही, असे नमूद करतानाच आसामचा कारभार आसामची जनताच हाकेल, अशा शब्दांत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, लखनऊ येथे झालेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमात प्रियांका गांधी यांनीही भाजपवर तोफ डागली.
गुवाहाटी येथे नागरिकत्व कायद्याविरुद्ध आयोजित मेळाव्यात बोलताना राहुल गांधी यांनी ठिकठिकाणच्या हिंसक आंदोलनांचा दाखला देत देशात पुन्हा एकदा नोटबंदीनंतर जशी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. सध्या देशात जे काही घडत आहे त्यामागे भाजप सरकारचा कुटील डाव आहे. लोकांना आपसात लढवण्यासाठीच हे सगळं सुरू आहे. हे जिथे जातात तिथे केवळ द्वेष पसरवण्याचेच काम करतात, असे राहुल म्हणाले. आसाममध्ये भाजपचा हा डाव यशस्वी होणार नाही. द्वेष आसामला मान्य नसून येथील जनता शांततेचा मार्ग चोखाळून सलोखा जपूनच पुढे मार्गक्रमण करेल, असे राहुल म्हणाले. आसामध्ये युवावर्ग रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. संपूर्ण देशात हेच वातावरण आहे. मात्र, आंदोलकांवर गोळ्या चालवल्या जात आहेत. जनतेचा आवाज भाजपला ऐकायचा नाहीय. तुमच्या आवाजाची भीती या सरकारला वाटतेय. तुमचा आवाज दाबून टाकण्याचे धोरण या सरकारने आखलेय, असा घणाघात राहुल यांनी केला