जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा एकलहरे (ता.आंबेगाव) येथे थोर समाजसुधारक सानेगुरुजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला पुणे जिल्हा समिती ग्रामीणच्या वतीने बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख विजय सुरुकुले होते.
मेळाव्याच्या प्रारंभी सानेगुरुजींच्या प्रतिमेचे पूजन शालेय विद्यार्थी व कथामाला कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले.'खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे' या प्रार्थनेने मेळाव्याची सुरुवात झाली.यावेळी शिक्षकनेते मंगेश मेहेर,रविंद्र वाजगे,प्रमिला हिंगे,प्रतिभा पडवळ,कमल थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.शेवाळवाडी(मंचर),शिंदेवाडी व एकलहरे शाळेतील विद्यार्थ्यांचे गीतगायन,कथाकथन,कृतीयुक्तगीत सादरीकरण व मजेशीर खेळ घेण्यात आले.
यावेळी विजय सुरुकुले म्हणाले ,'करी मनोरंजन जो मुलांचे,जडेल नाते प्रभुशी तयाचे या उक्तीप्रमाणे मनोरंजातून मुलांवर संस्कार करणारे सानेगुरुजी खरे देशभक्त होते.स्वच्छता त्यांना प्रिय होती.खोटे बोलणे त्यांना कधी जमले नाही.जे बोलायचे ते मनापासून आणि करायचे ते उत्तम कृतीतून.सानेगुरुजी यांचे विचार व चरित्र वाचनानेच समजेल.मुलांनी वाचावे व आईवडील,शिक्षक आणि राष्ट्राशी प्रामाणिक राहावे.
प्रसिद्ध जादूगार प्रकाश शिरोळे यांचे जादूचे प्रयोग बालआनंद मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले.यावेळी रुमालापासून बल्ब व चेंडू बनवणे,पाण्याची जादू,पेपर फाडणे व जोडणे,दोरीची काठी बनवणे व संमोहनाने मुलांना नाचविणे आदी जादूच्या प्रयोगामुळे मुलांचा आनंद द्विगुणीत झाला.
याप्रसंगी 'श्यामची आई' संस्कार परीक्षेसाठी विद्यार्थी बसविणाऱ्या नगदवाडी,पाबळवाडी(ता.जुन्नर),निगडाळे,शेवाळवाडी, शिंदेवाडी,एकलहरे(ता.आंबेगाव) येथील शिक्षकांना कथामाला पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायणगाव क्र १ व २,नारायणवाडी(ता.जुन्नर),चंदनवाडी व दारुंब्रे(ता.मावळ) या शाळांनी आजीव सभासदत्व स्विकारले.यावेळी प्रमिला हिंगे,विद्या वाघ,प्रतिभा पडवळ यांनी कथामालेसाठी दहा हजारांची देणगी दिली.
कार्यक्रमाची व्यवस्था संतोष थोरात,प्रदीप चासकर,अभिजित नाटे,अजिजा इनामदार यांनी पाहिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कथामाला राज्य प्रतिनिधी मुख्याध्यापिका मनिषा कानडे यांनी तर आभार कथामाला जिल्हा कार्यवाह चांगदेव पडवळ यांनी मानले.